हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे याच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी नुकतेच एक मोठे विधान केले आहे. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ. जे घडलं त्यासाठी जबाबदार आहेत त्यांना पक्षातून काढू नका, पण थोडं तरी बाजूला ठेवा,” असेही केसरकर यांनी म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. तसेच सत्यनारायण पूजेस उपस्थितीही लावली. यावेळी दीपक केसरकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आम्ही आता भाजपासोबत सत्तेत आलो आहोत. आमचे आता एक नवीन कुटुंब तयार झालं आहे. आता या कुटुंबामधून परत जायचं असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना उद्धव ठाकरे यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल.”
“अनेक लोक असे आहेत जे आम्ही कामं घेऊन जायचो तेव्हा आमच्याकडे ही कामं द्या, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतो असं म्हणायचे. त्यासाठी आम्ही आमदार झालेलो नाही. आमचे मुख्यमंत्री आमचे प्रतिनिधी असतात. त्यांच्या हातात अर्ज दिल्यानंतर आम्हालाही योग्य व्यक्तीच्या हातात सोपवल्याचं समाधान मिळते,” असेही केसरकर यांनी सांगितले.