हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापन केली असली तरी राणे कुटुंबीय आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यातील वाद अजून सुरूच आहे. केसरकरांनी राणेंच्या मुलांना लहान म्हणल्यानंतर निलेश राणेंनी थेट त्यांची लायकीच काढली होती. त्यावर पुन्हा एकदा केसरकरांनी पलटवार केला आहे.
राणे यांची मुले माझ्यापेक्षा निम्म्या वयाची आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा मला अधिकार आहे. त्यांना वडिलकीचा अधिकार कळत नसेल तर काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही,अस म्हणत राणेंची लायकी काय आहे हे सात कोकणच्या लोकांनी दाखवून दिली आहे. ते विसरले नसतील तर कोकणची जनता त्यांना पुन्हा एकदा त्यांची लायकी दाखवून देईल, असा पलटवार दीपक केसरकर यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
निलेश राणे नेमकं काय म्हणाले-
दरम्यान, निलेश राणे केसरकर यांच्यावर सडकून टीका केली होती. केसरकर यांनी लायकी पेक्षा जास्त बोलू नये. 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असू शकता पण आमचे नाही. त्यामुळे इज्जत मिळत आहे ती घ्यायला शिका नाहीतर आम्ही काय गप्प बसणार नाही. कोणाला काय बोलायच कुठं बोलायचं हे आधी विचारून घ्या आणि मगच तोंड उघडा असा इशारा निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना दिला.