हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या 50 समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही मिळवलं. परंतु जर त्यावेळी एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं असत तर त्यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:लाच संपवलं असतं, असा गौप्यस्फोट शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, एकनाथ शिंदे हा सच्चा मनुष्य आहे. ते म्हणाले होते, ज्यादिवशी मला वाटेल कि माझा हा उठाव यशस्वी होईल कि नाही, त्यादिवशी मी एकच गोष्ट केली असती, मी माझ्या सोबतच्या सर्व आमदारांना परत मागे पाठवलं असत, त्यानंतर एक फोन केला असता कि माझी चूक झाली, परंतु या आमदारांची यामध्ये काही चूक नाही. आणि तिथेच स्वतःला गोळी झाडून घेतली असती. माझ्यामुळे कोणत्याही आमदाराचे राजकीय नुकसान होऊ नये, प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल असा विचार करण्याऱ्या नेत्याच्या मागे जनता नक्कीच उभा राहते असेही केसरकर यांनी म्हंटल.
ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. ज्यादिवशी एकनाथ शिंदे यांचा अपमान झाला तो दिवसही शिवसेनेचा वर्धापनदिन होता. त्यादिवशी शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे हे आमचे विधिमंडळाचे नेते होते, मग त्यांचा अपमान तुम्ही का केला? असा सवाल केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना केला. एकनाथ शिंदे जरी रागावून निघून गेले असले तरी त्यांनी परत येण्याची भूमिका घेतली होती असेही केसरकर म्हणाले.