कराड | लोकप्रतिनिधींनी निवडणूकीपुरते केवळ राजकारणाचा विचार करावा. एकदा निवडूण आल्यानंतर लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. खा. श्रीनिवास पाटील साहेब यांनी 1999 ते 2009 या काळात राजकारण विरहीत विकासकामे केली. त्यानंतर दहा वर्षांनी 2019 साली पक्षाने निवडणूक लढण्यास सांगितले, तेव्हा विकास कामांमुळे सर्वसामान्यांची साथ मिळाल्यानेच विजय मिळवता आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी सांगितले.
साकुर्डी (ता.कराड) येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या साकव पूल बांधणे कामाचा भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी साकुर्डी गावचे सरपंच ॲड. विश्वासराव निकम, उपसरपंच सुहास जाधव, माजी उपसरपंच निवासराव जाधव, मनोज शिंदे, लक्ष्मण शिंदे, शिवाजीराव निकम, कराड पंचयात समितीचे माजी सदस्य विजयराव चव्हाण, साहेबराव गायकवाड, सुहास गायकवाड, ॲड. विजयसिंह पाटील, मारूल हवेलीचे सरपंच अशोक मगरे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
सारंग पाटील म्हणाले, खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कधीच मतांचा व विरोधकांचा विचार केला नाही. निवडणूक लढविताना एका पक्षांचा विचार असतो, त्यामुळे तेथे पक्षांची बाजू घ्यावी लागते. परंतु त्यानंतर लोकप्रतिनिधी सर्वांचा असतो. राष्ट्रवादी पक्षाने 2009 साली थांबायला सांगितले, साहेब थांबले. त्यानंतर 2019 साली अचानक निवडणूक लढण्यास सांगितले. तेव्हा या 80 वर्षाचा योध्दा पक्षासाठी रिंगणात उतरला. नेहमी विकासकामांचा ध्यास आणि लोकांचा विचार यामुळेच तगड्या उमेदवाराला धूळ चारण्यात खा. श्रीनिवास पाटील साहेब यशस्वी झाले.
यावेळी सरपंच ॲड. विश्वासराव निकम यांनी प्रास्ताविक केले. निवासराव शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आभार ॲड. विकासराव निकम यांनी केले.