राजकीय दबावतंत्रामुळे प्रशासनाकडून मंगल कार्यालये ताब्यात घेण्यास उशीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्ग वाढत असताना रूग्णांना उपचार सेवा देण्यासाठी महापालिकेने कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची घोषणा केली होती. मात्र पंधरा दिवस उलटले तरी प्रशासनाकडून मंगल कार्यालये ताब्यात घेण्यास उशीर केला जात आहे. अद्याप एकही मंगल कार्यालय ताब्यात घेण्यात आले नसून प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात आहे. त्यामुळे प्रशासन हतबल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे रूग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याने हेळसांड सुरूच असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद शहरात मागील महिनाभरापासून कोरोना उद्रेक झाला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या असलेले कोविड केअर सेंटर्स व खासगी रूग्णालयांतील बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिवसभर बेड्ससाठी शोधाशोध करावी लागत आहे. शहरात रोजचेच चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे बेड्सची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा निर्णय पालिकेने पंधरा दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानुसार 60 मंगल कार्यालयांची यादी देखील तयार केली गेली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 31 मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचे प्रभागनिहाय नियोजन देखील करण्यात आले. मात्र हे आदेश देऊन पंधरा दिवस झाले, तरी अद्याप एकही मंगल कार्यालय पालिकेने ताब्यात घेतलेले नसल्याचे शुक्रवारी समोर आले.

सोयींसाठी निविदा प्रक्रिया सुरू…

कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मंगल कार्यालयांत सोयीसुविधा उभ्या कराव्या लागणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया पालिकडून राबवली जात ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मंगल कार्यालये ताब्यात घेतली जातील. नंतर लगेच तेथे कोविड केअर सेंटर सुरु केली जातील, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

विरोधामुळे हात आखडता…

मंगल कार्यालयांत कोविड केअर सेंटर सुरु करण्यास काहीकडून विरोध होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मंगल कार्यालये ताब्यात घेण्यास हात आखडता घेतल्याचे बोलले जाते. कोविड केअर सेंटर व खासगी तसेच शासकीय रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे पालिका मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची कार्यवाही युध्दपातळीवर का करीत नाही, असा प्रश्न आता शहरवासीयांतून उपस्थित केला जात आहे.