औरंगाबाद | महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी अडीच एकर जागेची मागणी केली होती. या मागणीवर जिल्हा प्रशासनाने अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. या जागेचा प्रश्न सुटत नसल्यामुळे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम रखडले आहे. शहराला शहराच्या चार दिशांना चार कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने महापालिकेला 145 कोटी रुपयांची विशेष पॅकेज जाहीर केले आहे. त्यापैकी चिकलठाणा, पडेगाव आणि कांचनवाडी येथील प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. आणि चौथा प्रकल्प हर्सूल गावाजवळ असलेल्या सावंगी तलावाच्या पायथ्याशी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
तलावाच्या पायथ्याशी असलेल्या या जागेवर पालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरु केले होते, परंतु एका जमीन मालकाने आक्षेप घेत हे काम बंद करण्याची मागणी केली होती. त्या जमीन मालकाच्या जमिनीत पालिका कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारत आहे अशी त्याची तक्रार होती. यामुळे जमिनीचे मोजमाप घेतल्यानंतर खासगी जागेत प्रकल्प उभारला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पालिकेने प्रकल्प उभारणीचे काम थांबवले आणि जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी केली.
या कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी अडीच एकर जागेची गरज आहे परंतु सध्या महापालिकेकडे केवळ अर्धा एकर जागा आहे. उर्वरित जागा मिळावी यासाठी महापालिकेने प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. पण अजुनही त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत माहिती देताना शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले, कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी वर्ग दोनची जमीन खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची मंजूरी लागते. जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया पालिकेलाच पार पाडावी लागणार आहे, पण त्यासाठी जिल्हा प्रशासनाची मान्यता गरजेची आहे. या बद्दलचा प्रस्ताव पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. सध्या अर्धा एकर जागा ताब्यात आहे, आणखीन अडिच एकर जागा मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जागा ताब्यात मिळाल्यावर कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम लगेचच सुरू करता येईल असे पानझडे यांनी स्पष्ट केले.