हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज गटविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना होणार आहे. मुंबईने तब्बल 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली असून दिल्ली प्रथमच अंतिम फेरीत पोचला आहे. मॅचआधी दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने मुंबईच्या टीमला इशारा दिला आहे. फायनलसाठी आमच्या टीमला कमी लेखू नका, कारण आमच्या टीमची सर्वोत्कृष्ट कामगिरी अजूनही झालेली नाही, असं पॉण्टिंग म्हणाला आहे.
या मोसमातल्या आमच्या कामगिरीमुळे मी खुश आहे. हा हंगाम आमच्यासाठी चांगला राहिला. पण आम्ही इकडे आयपीएल जिंकण्यासाठी आलो आहोत, त्यामुळे आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू, अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली आहे.
‘आम्ही चांगली सुरुवात केली, पण शेवटी थोडं अपयश आलं. आमच्या खेळाडूंनी तीनपैकी दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, आता फायनलमध्येही याचीच पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक टीमने काही मॅच जिंकल्या, तर काही गमावल्या. पण आम्हाला ग्रुप स्टेजमध्येच पराभव पचवावे लागले. खेळाडूंसाठीही लय बदलणं कठीण होतं, पण त्यांनी करून दाखवलं. आता आम्ही फायनलमध्ये आहोत. आमचं सर्वोत्तम क्रिकेट खेळणं अजून बाकी आहे,’ असं वक्तव्य पॉण्टिंगने केलं.
आम्ही चांगली कामगिरी करण्यावरच भर देऊ – रोहित शर्मा
तर दुसरीकडे, अंतिम सामन्याबद्दल बोलताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईचा संघ यापूर्वी अंतिम सामना खेळण्याने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आम्हाला मानसिक फायदा अधिक असेल असं म्हटलं होतं. मात्र त्याचवेळी आयपीएलमध्ये प्रत्येक दिवस हा नवी असतो आणि प्रत्येक दिवशी नवीन तणाव असतो त्यामुळेच प्रत्येक सामना हा वेगळा असल्याने आम्ही चांगली कामगिरी करण्यावरच भर देऊ असंही रोहित म्हणाला. “पूर्वी काय झालं याबद्दल तुम्ही जास्त विचार करुन फायदा नसतो,” असंही रोहित म्हणाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’