नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची काल रात्री हत्या करण्यात आली. वसंत विहारमधील त्यांच्या घरी हि हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. तर बाकी २ जणांचा शोध चालू आहे.
काय आहे प्रकरण
हि घटना मंगळवारी रात्री घडली. किट्टी कुमारमंगलम दिल्लीतील वसंत विहार परिसरात राहत होत्या. ६७ वर्षांच्या किट्टी कुमारमंगलम यांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या आरोपींनी त्यांची हत्या केली आहे. किट्टी यांचे पती पी रंगराजन कुमारमंगलम वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. हि घटना घडली तेव्हा किट्टी यांच्यासोबत त्याची मोलकरीण होती. मोलकरणीने सांगितले कि, मंगळवारी रात्री धोबी आला, त्याने दरवाजा उघडला आणि तिला पकडून ओढत शेजारच्या खोलीत घेऊन गेला आणि बांधून ठेवले. यानंतर दोन तरुण घरात घुसले आणि उशीने किट्टी यांचे तोंड दाबले आणि त्यांची हत्या केली.
यानंतर मोलकरणीने स्वतःची सुटका करून आरडाओरडा केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. मोलकरणीने सांगितल्यानुसार तिला ज्या धोब्याने बांधले त्याचे नाव राजू आहे. तो वसंत विहारच्याच भंवर कॅम्पमध्ये राहतो. पोलिसांनी सध्या त्याला अटक केली आहे. हत्या करणाऱ्या अन्य दोन आरोपींची ओळख पातळी असून त्यांचा शोध सुरु आहे.