मुंबई । दिल्लीतील हिंसाचाराचं कनेक्शन हे आझाद मैदातील भाषणांशी लावत याबाबत चौकशीची मागणी करणारे पत्र भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना लिहलं आहे. या पात्रात अतुल भातखळकर यांनी आझाद मैदातील आंदोलनात अबू आझमींनी चिथावणीखोर भाषण केलं असून, त्या मागचा बोलवता धनी कोण हे शोधा, असं आवाहनही भातखळकर यांनी या पत्रात केलंय. ‘घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे, अशी वक्तव्य आझमीनी केल्याचा आरोपही अतुल भातखळकर यांनी सदर पत्रात केला आहे.
अतुल भातखळकर पत्रात लिहितात, भारतातल्या कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारनं तीन कृषी कायद्यांना मंजुरी दिली. परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत त्यांना भडकावत आहेत. याच विषयावर मुंबईतल्या आझाद मैदानात 25 जानेवारी 2021ला शेतकरी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनात मंचावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्रातील विविध नेते उपस्थित होते.
अबू आझमीची चौकशी करा, माझे गृहमंत्री @AmitShah यांना पत्र… pic.twitter.com/sOAgFHXIck
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 27, 2021
या आंदोलनात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी अत्यंत चिथावणीखोर भाषण करत लोकांना घराबाहेर पडत गोंधळ घालण्याचं आवाहन केलं होतं. त्यात मोदींबद्दल अबू आझमींनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. शेतकरी आंदोलनाच्या या मंचावरून अबू आझमींनी फक्त इतरांना भडकावण्याचं काम केलं होतं. अबू आझमींनी केलेल्या भडकाऊ भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी 26 जानेवारी 2021ला दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या आडून गोंधळ घालणं आणि लाल किल्ल्यावर झेंडा फटकावण्यासारख्या देशविरोधी कृत्ये केली. त्यामुळे अबू आझमींची चौकशी करणं आवश्यक आहे, असंही अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’