‘वेलेंटाइन डे’ सोबत मुख्यमंत्री केजरीवाल यांचे खास कनेक्शन, १४ फेब्रुवारीला घेणार शपथ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र बर्‍यापैकी स्पष्ट झालं आहे. दिल्लीतील लोकांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे सत्तेची चावी सोपविली आहे. जरी या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या जागा काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी निर्विवाद बहुमत त्यांनाच मिळताना दिसत आहे. तेव्हा दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा शपथ घेतील. मात्र, प्रश्न आता असा समोर येतो कि मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी केजरीवाल १४ फेब्रुवारीची तारीख निवडतील का? हा प्रश्न केवळ यामुळं तयार होतो कि, केजरीवाल आणि १४ फेब्रुवारी यांच्यात एक खास नातं आहे.

हे नातं समजण्यासाठी आपल्याला काहीस मागे जावं लागेल. अरविंद केजरीवाल यांनी दोनदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. १४ फेब्रुवारीशी त्यांचे नाते काहीशा अशाप्रकारे आहे कि, ४ डिसेंबर २०१३ रोजी दिल्लीत विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत भाजपाला ३१, काँग्रेसला ८ आणि ‘आप’ ला २८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं आप आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं होत. २८ डिसेंबर रोजी केजरीवाल यांनी प्रथमच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर आप आणि काँग्रेसमधील संबंध ताणले गेले आणि यांनी ४९ दिवस संयुक्त सरकार चालवल्यानंतर १४ फेब्रुवारी २०१४ ला राजीनामा दिला. आणि त्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

पुढील वर्षी १२ जानेवारी २०१५ रोजी दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. निवडणूक आयोगाने ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि १० फेब्रुवारीला निकाल जाहीर केला. त्यावेळी आपचे प्रवक्ते राघव चढ्ढा म्हणाले होते की, आपचे सरकार सत्तेत आला तर अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारीला शपथ घेतील आणि दिल्लीबरोबर ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करतील. ‘आप’ने पूर्ण ताकदीने निवडणूक लढविली आणि ७० पैकी ६७ जागा जिंकून इतिहास रचला. त्यावेळी काँग्रेसचे खातेही उघडलेले नाही. या विजयानंतर केजरीवाल यांनी १४ फेब्रुवारीला दिल्लीतील रामलीला मैदानावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

त्या दिवसानंतर अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारीला खास दिवस मनू लागले. सरकारचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर १४ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांनी ट्विट केले की, ‘गेल्या वर्षी या दिवशी दिल्ली आपच्या प्रेमात पडली होती. हे नातं खूप खोल आहे आणि कधीही संपणार नाही.’ वर्ष २०१८ मध्ये सुद्धा केजरीवाल सरकारने १४ फेब्रुवारीला सरकारचे तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा आज ११ फेब्रुवारीला जवळपास निकाल जाहीर झाला आहे. तेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी केजरीवाल १४ फेब्रुवारीची निवड करत या तारखेशी असलेलं आपलं खास नातं पुन्हा एकदा सिद्ध करतील का हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment