मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात पोलिसी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये चेंबूर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांकडे दोन लाखांची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी आरोपीच्या बहिणीने वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर महिला पोलीस निरीक्षकासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खंडणी प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल होताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण ?
शालिनी शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या महिला पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्या चेंबूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तसेच शालिनी शर्मा यांच्यासह निलंबित पोलीस अधिकारी अनिल उर्फ भानुदास जाधव आणि पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आरोपीची बहीण शहिदा कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचा हस्तक आणि आरोपी राजू सोनटक्के याने व्हॉट्सअॅप कॉल करून फिर्यादी महिलेकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. जामीन हवा असेल तर लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा, अन्यथा या प्रकरणात आरोपीला अडकवू अशी धमकी देखील आरोपीकडून देण्यात आली होती.
यानंतर आरोपीची बहीण शहिदा कुरेशी यांनी पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यासह, निलंबित पोलीस अधिकारी अनिल उर्फ भानुदास जाधव आणि पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जामिनासाठी आरोपीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले पोलीस अधिकारी जाधव याने यापूर्वीदेखील अन्य एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देखील दिली होती. या प्रकरणात सर्वात महत्वाचे म्हणजे महिला पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.