उत्तरप्रदेशात शिवसेना किती जागा लढवणार; संजय राऊतांनी आकडाच सांगितला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना 60 जागा लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीतही शिवसेना 20 जागांवर आपले उमेदवार उभे करेल असे संजय राऊत यांनी म्हंटल. संजय राऊत हे सध्या उत्तरप्रदेश दौऱ्यावर असून आज पत्रकार परिषद घेत याबाबत त्यांनी माहिती दिली.

उत्तर प्रदेशातील निवडणूक महत्त्वाची असून उत्तर प्रदेशातील निकालाने देशाची दिशा आणि दशा दाखवली जाते. त्यामुळे संपूर्ण देश उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे पाहत आहे. मी आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात आलो आहे. याच राज्यातून पंतप्रधान निवडून येतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही 50 ते 60 उमेदवार आम्ही उभे केले आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 15 उमेदवार रिंगणात आहेत. पाचव्या आणि सातव्या टप्प्यात 30 उमेदवार उभे करणार आहोत, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेने सोबत राष्ट्रवादी काँग्रेसही उत्तरप्रदेश निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींमुळे भाजपसाठी उत्तरप्रदेश निवडणूक ही म्हणावी तशी सोप्पी राहिली नाही.