हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू सर्वकाही उघडण्यास सुरुवात झाली आहे. सराफ दुकाने उघडण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र सोन्याच्या किंमती वाढत आहेत. देशातील एकूण परिस्थिती ही आर्थिक मंदीच्या दिशेने आहे. या भीतीमुळे नागरिक सोन्याच्या खरेदीकडे वळत नाहीयेत. त्यामुळे येत्या काही दिवसात तरी सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता नाही.
जगातील मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री होणारा दुसऱ्या क्रमांकाच्या देशात आर्थिक विकास दरातील घसरणीमुळे पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी आधीच कमी झाली होती. २५ मार्चपासून लागू झालेल्या दोन महिन्यांच्या संचारबंदीत सोनेविक्री आणखी घसरली. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काैन्सिलचे उपाध्यक्ष शंकर सेन यांच्या म्हणण्यानुसार १ जूनपासून सराफ बाजारपेठ सुरू होऊ लागली आहे, मात्र, अद्याप ग्राहकांनी सोनेखरेदीत रस दाखविला नाही. सध्या लोक आपला नोकरी व्यवसाय सांभाळण्याकडे लक्ष देत आहेत.
आधीच ऑर्डर दिलेले लोक व ऑनलाईन खरेदी केलेले लोक आता प्रत्यक्ष दागिने घेत आहेत. वाहतूक सुरू न झाल्यामुळेही ग्राहकांची संख्या कमी हाेत आहे. सेन म्हणाले, जून महिन्यातही विक्री खूप कमी होण्याची शक्यता आहे.सोन्याची मागणी आणि खरेदी सप्टेंबरआधी होणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. सणासुदीत होणारी दागिन्यांची खरेदीही लोकांनी टाळली आहे. यंदा संचारबंदीमुळे अक्षय्य तृतीयेलाही सोन्याची नाममात्र विक्री झाली आहे. सोन्याच्या वाढत्या किमती, आर्थिक मरगळीमुळे लोकांच्या क्रयशक्तीत आलेल्या घसरणीमुळे नजीकच्या भविष्यात जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायाला दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.