नाशिक । राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या साऱ्यात नाशिक जिल्ह्यातील एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Auction for the post of Sarpanch)
जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथे चक्क सरपंच पदाचा लिलाव करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात समस्त ग्रामस्थांनी या सभेत सहभाग घेतला. सभेत रामेश्वर महाराज मंदिर बांधकामासाठी लिलाव बोली लावण्यात आली. बोली जिंकणाऱ्यास सरपंच पद बहाल करण्यात येणार होते.
नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासतात्या देवरे यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व उमराणे ग्रामपंचायत माजी सरपंच प्रशांत (चंदूदादा) विश्वासराव देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं हा लिलाव जिंकला. या पॅनलनं मंदिरासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावली होती. लिलाव पार पडल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलं. ठरल्यानुसार बोली जिंकणाऱ्या पॅनलकडे ग्रामपंचायतीचा कारभार गेला आहे. कळवण सटाणा देवळा मालेगांव पंचक्रोशीत प्रथमच असा निर्णय झाला आहे. हा सर्व प्रकार पाहता लोकशाहीचा बाजार मांडल्याचे चित्र दिसत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’