हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटताना दिसत आहेत. विरोधकांनी मनोहर भिडे यांच्या अटकेचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात चांगलाच उचलून धरला आहे. यामध्येच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर भिडे यांचा उल्लेख गुरुजी असा केल्यामुळे विरोधकांनी अधिवेशनात चांगलाच गोंधळ घातला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील विरोधकांना प्रत्युत्तर देण्यात आले.
आजच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना, “संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, तुम्हाला काय हरकत आहे?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना विचारला. तसेच “संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात, गडकिल्ल्यांसाठी काम करतात, मात्र महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार नाही” असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोहर भिडे यांच्यावर लावलेल्या आरोपांवर देखील फडणवीस यांनी चव्हाण यांना सुनावले.
पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्युत्तर देताना, “त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे, बाबा कसं आलं याचा पुरावा मागू का? असा पुरावा मागता येतो का, त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर, “संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि त्यांच्या किल्ल्यांशी बहुजनांना जोडण्याचं काम करतात. हे त्यांचं कार्य चांगलं आहे. परंतु, त्यांना महापुरुषांबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही” असेही फडणवीसांनी म्हणले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच, महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील असल्याचे मनोहर भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांना अटक करण्याची मागणी उचलून धरली. आतापर्यंत भिडे यांना अटक करण्यात न आल्यामुळे आज विधानसभेत गोंधळ पाहिला मिळाला.