सातबार्‍यावरील नाव बदलासाठी लाच मागणारे नायब तहसीलदार अन् महसूल सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

गोटखिंडी येथील एका शेतकर्‍याकडे सातबारा उतार्‍यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना येथील अप्पर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बाजीराव राजाराम पाटील व महसूल सहाय्यक, सुधीर दीपक तमायचे यांना सांगलीतील लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले.

गोटखिंडी येथील एक शेतकरी यांनी त्यांच्या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून देण्याबाबत अपर तहसीलदार कार्यालय आष्टा या ठिकाणी अर्ज केला होता. तक्रारदार यांचे सातबारा उतार्‍यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून देण्याच्या कामामध्ये सही करून प्रकरण तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी नायब तहसीलदार पाटील व लिपिक तमायचे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदारांनी सोमवारी दिला होता. त्यानुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे लोकसेवक पाटील व लोकसेवक तमायचे यांची पंचा समक्ष पडताळणी केली असता पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक पाटील व लोकसेवक तमायचे यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपये लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवार 22 रोजी त्यांच्या विरुद्ध अपर तहसीलदार कार्यालय आष्टा या ठिकाणी सापळा लावला असता महसूल सहायक लोकसेवक सुधीर दीपक तमायचे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून एक हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले.

Leave a Comment