कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
राज्यात सत्तेत असलेल्या मंत्रीमंडळात मंत्री महोदयांची पुरेशी संख्या नसल्याने, एका मंत्री महोदयांकडे अनेक खात्यांची जबाबदारी आहे, मंत्री महोदयांनी त्या- त्या विभागाला न्याय देण्याचे काम केले पाहिजे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. त्यामुळे कोणत्याही विभागाला न्याय मिळत नाही, यामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. पर्यायाने राज्याच्या विकासाला खीळ बसली आहे, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री व आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
होळीचागांव (ता. खटाव) येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन आणि नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, जितेंद्र पवार, नंदकुमार मोरे, सी.एम.पाटील, सुरेश पाटील, सुहास पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्थानिक विकास निधीअंतर्गत होळीचागांव येथे सिध्दनाथ मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, डोंगरी विकास निधी योजनेतून प्राथमिक शाळेस संरक्षक भिंत बांधणे, स्थानीक विकास निधीतून मारूती मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, जनसुविधा योजनेतून स्मशानभूमी सुधारणा करणे, अर्थसंकल्प अनुदान सन- मार्च २०२० मधून रा.मा .६० ते बनपूरी- अंबवडे – होळीचागांव – शेनवडी – चोराडे ते रा.मा .१४३ रस्ता प्रजिमा ९ ६ कि.मी.९ / ६०० ते १५/२०० ( भाग होळीचागांव ते चोराडे ) रस्त्याचे रूंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, रा.मा.१४० ते नांदोशी – औंध – पळशी – निमसोड – मोराळे रस्त्याचे रूंदीकरणासह मजबुतीकरण करणे प्रजिमा . ४२ कि.मी. ११/०० ते १ ९ / ५०० ( भाग – पळशी – भूषणगड – होळीचागांव – निमसोड ), जलजीवन मिशन योजनेतून नवीन वितरण व्यवस्था करणे, डोंगरी विकास निधी योजना अंगणवाडी क्र.२ साठी इमारत बांधणे, विशेष घटक साकव योजनेतून होळीचागांव येथील मागासवगीय वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावर साकव पूल बांधणे. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना मागासवर्गीय वस्तीत अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे व बंदिस्त आर.सी.सी. गटर बांधणे, मागासवर्गीय वसाहतीमधील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ मधून लघु पाटबंधारे विभाग-सिमेंट बंधारा बांधणे जिल्हा वार्षिक योजना – २०२२-२३ – कृषी विभाग -सिमेंट बंधारा बांधणे, जनसुविधा योजनेतून आर.सी.सी. गटर बांधणे, स्मशानभूमी सुधारणा करणे, रोजगारहमी योजनेअंतर्गत प्राथमिक शाळा परिसरामध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे, शिंदे मळ्याकडे जाणारा पाणंद रस्ता सुधारणा करणे, प्राथमिक शाळा खोली दुरूस्ती योजनेतून प्राथमिक शाळाखोली दुरूस्ती करणे. आदी. नव्याने मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका पालिका, नगरपालिका यांवर प्रशासक आहेत, सरकार निवडणूक घेण्याचे धाडस करत नाही, सरकार कोणत्या मार्गाने सत्तेत आले आहे, हे सर्व जनतेला माहीत आहे, निवडणुका घेतल्या तर सरकारला धक्का बसू शकतो या भीतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेतल्या जात नाहीत. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, सुनील माने, जितेंद्र पवार, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खटाव पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊसाहेब लादे यांनी केले, सूत्रसंचालन उपसरपंच रणजीत शेटे यांनी केले व आभार पांडुरंग शिंदे (नाना) यांनी मानले.