स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार असलेले देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला असे म्हणत शेट्टी यांनी भुयार यांना घरचा रस्ता दाखवला.

आमदार भोईर यांनी मंत्रिपदासाठी पक्ष नेते खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आग्रह धरला. त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक दिवसांपासून पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते व देवेंद्र भुयार यांच्यामध्ये खटके उडत होते. दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार यांनी इतर पक्ष्यांची जवळीक साधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला सुद्धा लावणे बंद केले होते. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी आमदार भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करा असा प्रस्ताव राजू शेट्टी यांना दिला होता यावरूनच ही कारवाई करण्यात आली आहे.

आमदार देवेंद्र भूयार हे वरुड मोर्शी मतदारसंघातून निवडून आले होते. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना त्यांनी पराभूत केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते एकमेव आमदार होते. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. दरम्यान, आज माजी खासदार राजू शेट्टी विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment