हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी उद्या ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करायला लावलं आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन करून मत देण्याची विनंती केली आहे
उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू शकतो. देवेंद्र फडणवीस कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाहीत. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचे मत देखील भाजपसाठी महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी राज ठाकरेंना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढलेली पाहायला मिळाली. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न उचलून धरल्यानंतर त्यांना सर्वात आधी पाठिंबा देणारा पक्ष भाजपचं होता. तसेच हिंदुत्त्वाचा मुद्दा हे सुद्धा दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे महत्त्वाचे कारण आहे