हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटलांनी कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. खास करून देवेंद्र फडणवीस, प्रविक दरेकर , प्रसाद लाड यांच्यासारखे भाजप नेते जरांगे पाटलांच्या निशाणावर आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी अडचणीत ठरत असून महाविकास आघाडीला फायदेशीर ठरत आहे. मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला शरद पवार-उद्धव ठाकरे तयार आहेत का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीला कोंडीत पकडलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील बालेवाडी येथे भाजपचे महाअधिवेशन सुरु आहे. यावेळी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी फडणवीस म्हणाले, आज अनेक समाज एकमेकांसमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की, हे समाज एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो. म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायेत. माझा
मनोज जरांगे पाटलांना सवालच नाहीये. माझा सवाल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे की, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याकरता तुमचं समर्थन आहे का ते तुम्ही स्पष्ट करा.
फडणवीस पुढे म्हणाले, मराठा समाजातील जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे. निवडणुका येतील आणी जातील एखादे सरकार बनेल, राहणार नाही, सरकार येतात आणि जातात. पण, समाज एकसंघ राहिला पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल, पण एकदा का समाजामध्ये दुफळी निर्माण झाली तर किमान तीन पिढ्यातील दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. तसेच शरद पवार साहेब चार वेळा स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी केला.