हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष हे पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असून आशिष शेलार हे यापूर्वीच दिल्लीत दाखल झाले आहेत. तर काही दिवसांत पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मध्ये खांदेपालट होऊन प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार का अशी चर्चा होती त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाचा अलीकडंच विस्तार झाला आहे. अनेक नवे मंत्री आले आहेत. त्यांच्या भेटीगाठी घेऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही दिल्लीत गेलो होतो. त्यामागे इतर कुठलंही कारण नाही. पक्षात कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची तर अजिबात चर्चा नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठिशी आहेत, दिल्लीतील हायकमांड त्यांच्या पाठिशी आहेत. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. कृपया कंड्या पिकवू नका, पतंगबाजी करू नका. चुकीच्या बातम्या करू नका. बातम्या कमी पडल्या, तर मला बातमी मागा”, असं म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांना देखील टोला लगावला.