हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज बारामतीमध्ये (Baramati) राज्य सरकारचा (State Government) नमो रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) तसेच शरद पवार या प्रमुख राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. मुख्य म्हणजे, रोजगार मेळाव्यानिमित्त विरोधक आणि सत्ताधारी एकाच मंचावर बसलेले दिसून आले. मात्र यावेळी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टोलेबाजी करण्याऐवजी अजित पवारांनाच डिवचले. आजच्या या मेळाव्यात गृहमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केले. यावेळी त्यांनी, “अजित पवारांना गृहमंत्री पद मिळणार नाही”, असे स्पष्ट सांगून दिले.
गृहखातं माझ्याकडेच ठेवेन…
रोजगार मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अजितदादांनी हेवा वाटावं असे बस स्टँड उभारले आहे. त्यांनी एखाद्या कार्पोरेटचे ऑफिस वाटावे असेच पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशन बनवले आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की, पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, त्या चांगल्या इमारती करण्यासाठी तुम्हालाच पीएमसी म्हणून नेमावं. त्यावर अजितदादा म्हणतील, पीएमसीच का? गृह खातं माझ्याकडे द्या. मी चांगल्या इमारती बांधतो. पण दादा नाही, ते देणार नाही. गृहखातं माझ्याकडेच ठेवेन”
त्यानंतर पुढे बोलताना, “मी फुशारकी मारत नाही, पण बारामतीतील प्रत्येक इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत मी चाळीस- चाळीस वेळा भेटी दिल्या. करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर आपण त्याच्या नादाला लागत नाही. राज्यातील विकासकामे करताना मी मनापासून ती कामे करतो. बारामतीला राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा असून त्यासाठी आपली साथ हवी” अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, आज बारामतीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी बस स्टँड, पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय आणि पोलिसांच्या निवासी इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. या इमारती आणि बस स्टॅन्ड पाहून उपमुख्यमंत्री नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी देखील अजित पवारांचे तोंड भरून कौतुक केले. या सर्व इमारती एखादे कॉर्पोरेट ऑफिस वाटावे अशा बांधण्यात आल्या आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी देखील अजित पवारांचे कौतुक केले.