2024 मध्ये युतीचा मुख्यमंत्री कोण? फडणवीसांच्या उत्तराने चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं युतीचे सरकार असलं तरी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या एका बॅनरबाजीमुळे युतीत तणाव आला होता. या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती एकनाथ शिंदे यांनाच असलयाचे दाखवण्यात आलं होते. त्यामुळे भाजप नाराज झाल्याचेही चर्चा सुरु होती. त्यातच आता भविष्यात युतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना केला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच रिपब्लिक भारतला मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांना युतीच्या पुढच्या मुख्यमंत्र्यांबाबत विचारलं असताना फडणवीसांनी सावध उत्तर दिले. जो मुख्यमंत्री असतो त्याच्याच नेतृत्त्वात निवडणूक लढवली जाते त्यामुळे आम्ही २०२४ ची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, परंतु त्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल हे भाजपचे संसदीय बोर्ड ठरवेल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे त्याबाबत तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारावं लागेल, कारण मलाही याबाबत कमेंट करण्याचा अधिकार नाही असं फडणवीस यांनी म्हंटल. फडणवीसांच्या या सावध प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा सस्पेन्स वाढला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडून राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरातबाजी केली होती. परंतु त्यानंतर आमच्या लोकांकडून चूक झाल्याचेही एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सांगितलं असं फडणवीस यांनी म्हंटल. तसेच एकनाथ शिंदे आणि माझ्यात उत्तम संवाद आणि समन्वय आहे. मी कधीही एकनाथ शिंदे यांचा मानसन्मान, प्रोटोकॉल तोडत नाही. आणि दुसरीकडे ते सुद्धा मला कधीच मी उपमुख्यमंत्री असल्याचं भासवू देत नाहीत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.