जालना | शहाजी भोसले
सध्या महाराष्ट्रभर गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. गौरी गणपतीच्या या सणादरम्यान जालना जिल्ह्यात अजब प्रकार घडला आहे. भोकरदन येथे चक्क देवी रडल्याचा चमत्कार घडल्याचे बोलले जात आहे. मात्र महाराष्ट्र अंनिस च्या कार्यकर्त्यांनी देवी रडण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश केल अाहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, भोकरदन येथे चंचल वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या घरी महालक्ष्मी मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. देवीची स्थापना केल्यानंतर देवीच्या मूर्ती रडत असल्याचे शेजारील काही व्यक्तींनी वाघमारे यांच्या लक्षात आणुन दिले. त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांनाही देवीच्या मूर्ती रडत असल्याचा चमत्काराबाबत सांगितले. या चमत्काराची बातमी बघता बघता भोकरदन व पंचक्रोशीत वार्यासारखी पसरली. भाविकांची गर्दी होऊ लागली. अनेक जण मूर्तीं समोर पैसे टाकू लागले. त्यामुळे या मूर्ती एका महाराजाच्या सांगण्यावरुन विसर्जित करायच्या नाहीत असा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांना काल मंगळवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी एका पत्रकाराने फोन करून कळवले. त्यावेळी शहाजी भोसले हे खुलताबाद येथील दर्ग्यातील मौलानाची तक्रार देण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना भेटण्यास गेले असल्याने भोकरदन येथे जाऊन याबाबतचा तपास करणे शक्य नव्हते. म्हणून भोसले यांनी महाराष्ट्र अंनिसच्या भोकरदन शाखेचे राजेंद्र दारुंटे यांच्याशी संपर्क केला. त्यांना मूर्ती रडल्याचा चमत्कार कसा असू शकतो. त्यामागील विज्ञान काय असू शकते. तसेच शहनिशा कशी करावी याबाबतची पूर्ण कल्पना दिली व तेथे जाऊन त्या चमत्काराचा छडा लावण्यासाठी सांगितले. राजेंद्र दारुंटे यांनी आपल्या सोबत महाराष्ट्र अंनिस चेकमलाकर इंगळे व त्र्यंबक पाबळे या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाघमारे यांचे निवासस्थान गाठले. तेथील प्रकरणाची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्था याचे भान ठेवून तपास केला. योग्य ती शहनिशा केल्यावर खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
“देवीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवलेल्या होत्या. त्या मूर्तीचे डोळे हुभेहुब मानवी डोळ्यांसारखे होते. डोळ्यांना चकाकी येण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर केला असल्याने मूर्तींचे डोळे पाणीदार वाटत होते. त्या मूर्तींवर मर्क्युरी लाईटचा फोकस पडल्यानंतर डोळे चमकू लागले असल्याने देवीच्या मूर्तींच्या डोळ्यांची चमक डोळ्यात पानी (अश्रु) असल्याच अभास निर्माण करत होते. त्यामुळे मूर्ती रडत आहेत अशी अफवा पसरवण्यात आली होती. खरं तर डोळ्यातून पाणी निघत नव्हते.”
सदरील प्रकाराची सत्यता महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वाघमारे यांच्या लक्षात आणून दिली. अंधश्रद्धा पसरवून लोकांची दिशाभूल करणे हा गुन्हा ठरू शकतो व त्यामुळे आपल्यावर काही कायदेशीर कार्यवाही होऊ शकते अशी समज वाघमारे यांना दिली. वाघमारे यांना कार्यकर्त्यांचे म्हणणे पटले व त्यांनी काल दिनांक १८ सप्टेंबर रोजी रात्री देवीच्या मूर्तींचे विसर्जन केले. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने पुढील होणारा अनर्थ टळला हे मात्र तेवढेच खरे आहे.