विट्यात महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा, महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध शेतकरी आक्रमक

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करणे तसेच मुख्य डीपी बंद करणे तसेच दिवसा वीजपुरवठा न करता रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू ठेवणे, असा महावितरणच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात महावितरणच्या कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी धडक मोर्चा काढला. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या वीज कनेक्शन संदर्भात अनेक तक्रारी आहेत. शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करणे तसेच मुख्य डीपी बंद करण्याचा प्रकार सुरू केला आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात तीन महिने शेती वीज बील भरण्याबाबत घोषणा केली असताना अनेक ठिकाणी महावितरणचा वीज कनेक्शन खंडीत करून मनमानी कारभार सुरू आहे. तसेच ज्या ठिकाणी वीजपुरवठा सुरू आहे.अशा गावामध्ये दिवसा वीजपुरवठा न करता महावितरणने रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू ठेवून शेतकर्‍यांवर अन्याय सुरू केला आहे.

परिणामी रात्रीच्या वेळी साप, तरस, आणि अन्य वन्य प्राण्यांपासून शेतकर्‍यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तरी महावितरणच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात नगरपरिषद इमारतीतील महावितरणच्या कार्यालयावर शेतकर्‍यांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरवात झाली. मायणी रोडमार्गे नगरपरिषद इमारत आवारात मोर्चा आला. या मोर्चाचे रुपंतर निषेध सभेत झाले. आंदोलकांनी तीव्र शब्दांत महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका मांडली.