शिवसेनेचे धैर्यशील माने राजू शेट्टींच्या घरी, शेट्टींच्या आईने दिला हा आशिर्वाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ज्या राजू शेट्टी यांचा पराभव केला ते शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी खुद्द राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. शिरोळ परिसरात असणाऱ्या राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन माने यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतल्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणाचा नवा पॅटर्न सुरु झाला आहे. तसेच माने यांनी राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असं कधीही पाहायला मिळालं नाही. पण ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच घरी जाऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेण्याच्या एका परंपरेचा पायंडा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पडला आहे.
खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींसोबत संवाद साधल्यानंतर त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. “मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वाद राहू दे, असं धैर्यशील माने राजू शेट्टी यांच्या आईला म्हणाले. यावर “माझा आशीर्वाद लय मोठा आहे. माझा लेक सर्वांना धरुन आहे, तसं तुम्हीही लोकांना धरुन राहा,” असा आशीर्वाद राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.

दरम्यान राजू शेट्टी यांची भेट घेताना शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नूतन खासदार माने यांच स्वागत माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

Leave a Comment