मुंबई | भाजपने आपला डाव टाकत अखेर तिसरा उमेदवार राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा रविवारी रात्री दिल्लीत केली आहे. त्यामुळे भाजपाची खेळी अन् कोल्हापूरच्या दोन पैलवान आमनेसामने भिडणार हे निश्चित झाले आहे.
भाजपकडे दोन उमेदवार निवडूण येण्याची मते आहेत. त्यामुळे ते तिसरा उमेदवार घोषित करण्या संदर्भात खात्रीशीर नव्हते. त्यामुळे रविवारी रात्री पहिल्यांदा केवळ केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नावे जाहीर करण्यात आली. परंतु काही वेळानंतर दिल्लीतून कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांचे नाव तिसऱ्या जागेसाठी घोषित करण्यात आले.
धनजंय महाडिक यांचे नाव घोषित झाल्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे. यामुळे यापूर्वी सहाव्या जागेसाठी अर्ज भरलेल्या कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना आता सहजासहजी राज्यसभेवर जाता येणार नाही. राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक जाहीर झाली आहे. यात आता 7 उमेदवारांची घोषणा झाली आहे. भाजपला तिसरी जागा जिंकण्यासाठी केवळ 13 मत कमी पडत आहेत.
विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसची एक, काँग्रेसची एक आणि शिवसेनेची एक जागा निवडुन येवू शकते. तर महाविकास आघाडीकडील अतिरीक्त मतांच्या आधारावर शिवसेना वैयक्तिक दुसरी आणि निवडणुकीतील सहावी जागा लढवत आहे. याचसाठी संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून उत्तरप्रदेशमधील कवी आणि काँग्रेसचा अल्पसंख्यांक चेहरा समजले जाणारे इम्रान प्रतापगडी, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. शिवाय शिवसेनेने विद्यमान खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.