मुंबई | लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना होण्याअगोदरच सरकारने ते महामंडळ गुंडाळून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासह लाखो ऊसतोड कामगारांचा अपमान केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. आमदार विनायकराव मेटे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न, सुरक्षा आणि त्यांच्या समस्या यावर सरकारवर तोफ डागली.
हे सरकार ऊसतोड कामगारांच्या बाबतीत अत्यंत उदासिन आहे. राज्यात ऊसतोड कामगारांचे अपघाती मृत्यु होत आहेत. दुष्काळ आणि टंचाईमुळे लाखो मजुर ऊसतोडीसाठी बाहेर जात आहेत त्यांना सुरक्षा नाही. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी सुरक्षा विमा योजनेत बदल करण्यात यावा शिवाय या योजनेतील विमा हप्ता ऊसतोड मजुरांनी नव्हे तर तो शासनाने आणि कारखानदारांनी भरावयाचा आहे त्यासाठी शासन काही प्रयत्न करणार का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी सरकारला केला.
ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी सरकार विमा संरक्षणासह निवृत्ती वेतन,पीएफसारखे लाभ देण्यासाठी काय उपाययोजना करणार आहे. याशिवाय विमा योजनेत देण्यात आलेल्या सध्याच्या लाभामध्ये बदल करुन त्यामध्ये वाढ करावी. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना गाळप हंगाम सुरु झाल्यावर सुरु केली आहे त्यासाठी वेगळी नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. कारखानदारांकडे कामगारांची आवश्यक माहीती उपलब्ध असताना वेगळी नोंदणी कशासाठी ? असा सवाल करतानाच ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी वसतीगृह आणि शाळा अस्तित्वात नाहीत त्यामुळे त्याठिकाणी साखर शाळा आणि कायमस्वरुपी वसतीगृह सुरु करावी आणि कामगारांच्या मुलांना अशिक्षित ठेवण्याचे पाप माथी मारुन घेवू नये अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.
दरम्यान लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सुरु करण्यात आलेले ऊसतोड कामगारांचे महामंडळ रद्द केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला आणि सभागृह दणाणून सोडले त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.
हजारो शेतकरी,आदिवासी विधानभवनावर धडकले आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंबीय सरकारची शोकसभा घालत आहे,कर्जमाफी द्या नाहीतर आत्महत्या करण्याची परवानगी द्या म्हणत उपोषणे होत आहेत , मराठा, धनगर , मुस्लिम आरक्षणाबाबत अस्वस्थ आहेत सरकार मात्र कुंभकर्णा सारखे झोपले आहे. #अधिवेशन pic.twitter.com/K1M3IXCfgR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 22, 2018