हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष (Santosh Deshmukh) देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराडला (walmik Karad) अटक झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर देखील जोरदार टीका केली जात आहे. या प्रकरणावरूनच विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील या प्रकरणात बारकाईने लक्ष घातल्यामुळे मुंडे भवितव्य धोक्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणात मोठ्या अनियमितता झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2021-22 च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत परळी आणि आंबेजोगाई येथे कामे झाली नसतानाही कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आली होती. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातही लाखो रुपयांची बोगस बिले उचलण्यात आली.
निधीच्या चौकशीचे आदेश
या सर्व आरोपांकडे गांभीर्याने लक्ष देत उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी मागील दोन वर्षांतील 877 कोटी रुपयांच्या निधीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, बीडमधील शाळा व अंगणवाड्यांना साहित्य पुरवण्याच्या प्रकल्पात ही मोठया प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून चौकशीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणांमुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहे. या प्रकरणामुळे त्यांचे मंत्रीपद धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे आहे. या सर्व प्रकरणांमध्ये भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, विरोधकांनी मुंडेंच्या गुन्हेगारी विश्वातील संबंधांबाबत सवाल उपस्थित करत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.