सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला.
तर जे पक्षात नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मला मानणारा वर्ग समाजात आहे. आजही धनगर समाज माझ्याच मागे आहे. मी समाजासाठी ३० वर्ष काम केले आहे. त्याग, संघर्ष केला आहे. समाजानेच मला मोठे केले असल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांना लगावला. भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज जानकर सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी आमदार रमेश शेंडगे आदी उपस्थित होते.
मंत्री जानकर म्हणाले, भाजप सरकार सत्तेत आल्यावर पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेणार होते. मात्र चळवळीत बोलताना संसदीय राजकारण कळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षण दिले आहे. राजकीय आरक्षणाचा प्रश्न आहे. तो राज्य सरकारच्या हातात नसून केंद्राच्या हातात आहे. त्यावर न्यायालयात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यासाठी राज्यसरकारची समाजाला न्याय देण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपमुळेच मिळणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.