हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांबरोबर इंद्रादी देवांनी महर्षि दुर्वास यांच्या शापातून मुक्त होण्यासाठी समुद्राचे मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
धनत्रयोदशी या सणामागे काही दंतकथाही आहे. असे म्हणतात की हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणून या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. भारतात काही ठिकाणी धनतेरसच्या दिवशी लोक सोने-चांदीची भांडी, नाणी, आभूषण इ. खरेदी करतात.
या सणाचं महत्त्व काय असं विचारलं तर त्याचे प्रतीकात्मक अर्थ आपल्याला ध्यानात ठेवावे लागतील. शब्दशः अर्थ घेण्यात काही अर्थ नसतो. या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या जगण्याची काळजी घ्यावी व अपमृत्यु टाळण्याचा प्रयत्न करावा. आरोग्याची विशेष काळजी घेतली तरी अनेक आजार दूर होतात. आरोग्य हेच धन असं आपल्याकडे म्हटलं जातंच. त्यांत अर्थ आहे. सुदृढ शरीर असेल तर पैसा कमावताही येईल व त्याचा उपभोगही घेता येईल. अन्यथा सारा पैसा शरीराचे आजारपण दूर करण्यातच खर्च होत जाईल. या निमित्ताने या गोष्टीची तुम्हा आम्हा सर्वांना आठवण झाली तरी पुरे.
(लेखक- प्रतीक पुरी)