हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 259 हेक्टरच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाने ५ हजार कोटींची बोली जिंकली आहे. अदानी समूहाने यावेळी डीएलएफला मागे टाकले ज्यांनी दोन हजार कोटींची बोली लावली होती, तर नमन समुहाला तांत्रिक मुद्द्यावरुन बाद करण्यात आलं. याबाबत अंतिम मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या परवानगीसाठी पाठविण्यात येणार आहे.
याबाबत प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास म्हणाले की, ही बोली संपूर्ण 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी आहे. 6.5 लाख झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी या प्रकल्पासाठी एकूण कालावधी सात वर्षांचा आहे. हा प्रकल्प 2.5 चौरस किमी परिसरात पसरलेला आहे. हा प्रकल्प मध्य मुंबईतील लाखो चौरस फूट निवासी आणि व्यावसायिक जागेचा वापर करून अधिक महसूल मिळवण्यास मदत करेल. मात्र त्यातील गुंतागुंतीमुळे ते अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे.
दरम्यान, जवळपास 300 एकरांमध्ये पसरलेल्या धारावीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. यात साधारणपणे 10 लाख नागरिकांचं वास्तव्य आहे. तर दुसरीकडे अदानी समूह आधीच देशातील अग्रगण्य रिअॅल्टी डेव्हलपर म्हणून स्थापित झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक प्रकल्पांवर काम करत आहे.