हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझी लाडकी बहीण आणि माझा लाडका भाऊ योजनेनंतर आता राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी नवी योजना सुरु झाली आहे. दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत (Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana) एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. या योजनेनुसार 2024-25 ते सन 2028-29 या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये दिव्यांगांना दर महिन्याला एक ते तीन हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे, योग्य औषधोपचार व आहार घेता यावा व व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारणांची संधी गमावल्यामुळे आलेले परालंबित्व कमी व्हावे, यासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ (Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana) सुरू करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत तब्बल ६० हजार दिव्यांग नागरिकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी 111.83 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे.
किती रुपये मिळणार? Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana
‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ अंतर्गत वय वर्ष १८ वरील ४० टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना दर महिन्याला १००० रुपये याप्रमाणे ६ महिन्याचे एकदम ६ हजार रुपये म्हणेजच वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळतील. तसेच ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दर महिन्याला ३००० रुपये या हिशोबाने दर ६ महिन्यानंतर एकत्रित १८ हजार रुपये याप्रमाणे दरवर्षी ३६ हजार रुपये मिळतील. पुढील ५ वर्षासाठी हिआर्थिक मदत मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD CARD) असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला https://portal.mcgm.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याठिकाणी योजनेसाठी पात्रतेचे निकष, योजनेच्या अर्टी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सर्व संबंधित विभाग कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.