सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे धावडी गावचे विद्यमान सरपंच अमोल रामचंद्र कांबळे यांचा सोमवारी दि. 13 डिसेंबर रोजी आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्व. अमोल कांबळे यांचे निधन रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाले आहे, त्यामुळे बांधकाम विभाग आणि संबधित ठेकेदार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सदरील ठेकेदारावर 15 दिवसाचे आत निलंबानांची कारवाई करावी. तसेच संबधित ठेकेदाराला कायम स्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे. जीव गमवाव्या लागलेल्या सरपंच अमोल कांबळे यांच्या कुटुंबाला सदर ठेकेदाराकडून योग्य ती आर्थिक मदत 15 दिवसाच्या आत मिळावी. तसेच सदर ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा धावडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून आत्मदहन करणार असल्याचा इशारा धावडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून यावेळी देण्यात आला.
वाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कामामुळे अमोल कांबळे यांचा जीव गेला आहे. आजपर्यंत मांढरदेव देवस्थान, धावडी ग्रामस्थ तसेच परिसरातील 3 ते 4 जणांचा जीव गेला आहे. या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे विद्यमान सरपंच अमोल कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. अमोल कांबळे हे गेल्या 8 महिन्यापूर्वीच सरपंच पदावर विराजमान झालेला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व वडिल असा परिवार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने योग्य ती कारवाई ठेकेदाराव करून कांबळे कुटुंबियांना मदत करण्याची मागणी धावडी ग्रामस्थांनी केलेली आहे.