औरंगाबाद – शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या सेवन हिल उड्डाणपुलाखाली भीक मागणाऱ्या एका टोळक्याने शिवसेना आमदाराच्या गाडीवर चालक असलेल्या राजू दाभाडे (रा. पीर बाजार, मिलिंद नगर) यांच्यासह त्यांच्या पत्नीला मारहाण केली. अनपेक्षितपणे टोळक्याने केलेल्या हल्ल्यानंतर उपस्थित जमावाने टोळक्याला बेदम चोप दिल्याची घटना काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. भर दुपारी झालेल्या या मारहाणीमुळे शहरात कायदा व्यवस्था अबाधित आहे का ? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्या वाहनावर चालक असलेले राजू दाभाडे हे खाजगी दवाखान्यातून पोटाची तपासणी करून सेवन हिल उड्डाणपुलाखालून पत्नीसह दुचाकीवरून घरी जात होते. सिग्नल लागल्यामुळे ते उड्डाणपुलाखाली थांबले असता, एक दगड त्यांच्या दिशेने आला. तो त्यांच्या पत्नीच्या जवळून गेला. याशिवाय 18 ते 19 वर्षे वयोगटातील ची एक महिला वारंवार त्यांच्या दिशेने दगड फेकताना दिसली. त्यानंतर दुसरा दगड देखील पत्नीच्या जवळून गेला. त्यामुळे त्यांनी सिग्नल संपताच दगड फेकणार्या महिलेला जाब विचारला. त्यावर महिलेने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच इतर चौघांनी थेट राजू यांच्यावर हल्ला केला एकाने काचेची बाटली फोडून राजू दाभाडे यांच्या हातावर मारली. यात त्यांना गंभीर इजा झाली. यावेळी जमलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करीत भांडण सोडवले त्यानंतरही टोळके शिवीगाळ करीत असत त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने अखेर दोन महिलांसह तीन पुरुषांना बेदम बदडून काढले.
या राज्याची माहिती जवाहर नगर पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक संतोष पाटील बंदोबस्तास घटनास्थळी दाखल झाले. या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, ही घटना पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे जवाहर नगर येथून त्यांना पुंडलिक नगर मध्ये पाठवण्यात आले. तेथे राजू दाभाडे यांच्या तक्रारीवरून गणेश गौडा (35, रा. पडेगाव), सत्यभामा गौडा (40, रा. पडेगाव) यांच्यासह इतर दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.