लातूर प्रतिनिधी । निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख आजारी पडले आहेत. धीरज देशमुख यांना लातूरमधील रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे सर्वच उमेदवार जोमाने प्रचार करत आहेत. प्रचाराची धावपळ आणि तब्येतीकडे झालेलं दुर्लक्ष धीरज देशमुख यांना महागात पडलं.
हवामानातील सततच्या बदलामुळे सध्या तापीच्या आजाराचे प्रमाण सगळीकडे वाढलं आहे. याची लागण धीरज देशमुखांनाही झाली. ‘कोणत्याही लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नसतं. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंगात थोडासा ताप होता, पण प्रचार सभांच्या व्यस्ततेमुळे तब्येतीकडे जरा दुर्लक्षच झालं. शेवटी नाईलाजाने काल लातूरमध्येच दवाखान्यात अँडमिट व्हावं लागलं.’ असं धीरज देशमुख यांनी फेसबुकवर लिहिलं आहे. ‘सध्या मी उपचार घेत असून आता प्रकृती सुधारते आहे. काळजी करु नये’ असं आवाहन धीरज देशमुख यांनी केलं. धीरज देशमुख यांना लातूरमधल्या सारडा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मतदानाचा दिवस तोंडावर आला असताना धीरज देशमुख आजारी पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तुमच्या शुभेच्छा आणि स्नेहाच्या बळावर मी लवकरच बरा होऊन आपणासोबत प्रचारात सहभागी होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या अनुपस्थितीत प्रचाराचं कार्य जोमात सुरु ठेवल्याबद्दल धीरज देशमुख यांनी समर्थकांचे शतश: आभार व्यक्त केले आहेत. पहिल्याच भाषणात धीरज देशमुख यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतर व्यासपीठावर उपस्थित विलासरावांच्या पत्नी वैशालीताई देशमुख, धीरज यांचे ज्येष्ठ बंधू आणि आमदार अमित देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यासह संपूर्ण देशमुख कुटुंबाचे डोळे पाणावले होते.