सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा नगरपालिकेने पावसाळा सुरू असल्याने शहराच्या हद्दीत अतिवृष्टी झाल्यास आपत्ती निर्माण होण्याची शक्यता असून आपत्तीचे निवारण करण्यासाठी व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.
मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात 70 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे सातारा शहरातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत नगरपालिकेकडून योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सातारा नगरपालिकेने खबरदारी घेतलेली आहे. शहरात धोकादायक ठिकाणे तसेच कोणतीही आपत्ती येवू नये, यासाठी आराखडा तयार केलेला आहे. या कमिटीतील कर्मचारी हे नागरिकांच्या हितासाठी काम करतील, तसेच कोणतीही आपत्ती आल्यास नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.