कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
महापिकोनेट हे Covid-19 मध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू झालेले महाराष्ट्र राज्यातील विविध संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क कोविड काळात स्थापन झाले असून या नेटवर्कने महाराष्ट्रातील विविध नैसर्गिक आपत्ती लक्षात घेत आपत्ती व्यवस्थापनाची प्रक्रिया राबविली जात आहे. युनिसेफच्या सहकार्याने ‘आपत्ती व्यवस्थापनात सामाजिक संस्थांची भूमिका’ या विषयावरती महापिकोनेटद्वारे आणि रेडआर इंडिया संस्थेच्या तज्ञ प्रशिक्षकांकडून राज्यातील सामाजिक संस्थांना चार दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणाच्या शुभारंभास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संस्थापक प्रा. विनोद मेनन, महापिकोनेटच्या कॅरोन शैवा, युनिसेफचे प्रतिनिधी, रेडआर इंडियाचे सचिव प्रसाद सेवेकरी आदी उपस्थित होते.
रेडआर इंडिया संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक श्री. मंदार वैद्य व सुजाता कोडाग यांनी चार दिवस महाराष्ट्र राज्यातील कोकण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागातील निवडक 20 सामाजिक संस्थांच्या सीनियर प्रतिनिधींना हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. आपत्ती येण्यापूर्वी, आपत्तीदरम्यान आणि आपत्तीनंतर सामाजिक संस्थांची भूमिका काय असावी? त्यातील कामांचे नियोजन कसे करावे? यावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले.
सुरुवातीच्या काळात 65 विविध संस्था मिळून सुरू झालेल्या नेटवर्कचे सदस्य, आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आहेत. यामुळे सामुदायिक पातळीवर GO-NGO समन्वय साधण्यासाठी दिशा व प्रेरणा मिळाली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप सहभागी संस्था प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.