कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कृष्णा- कोयना नदीकाठी असलेल्या कराड शहरावर पाणी कपातीची वेळ आलेली आहे. या पाणी कपातीमुळे नागरिकांच्यातून एक सुज्ञ नागरिक बॅनरबाजी करू लागला आहे. या सुज्ञ नागरिकाने बॅंनरबाजीतून आपला हक्क सांगितला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवित जबाबदारीची जाणीव करून देताना आपण सेवक आहात… मालक नाही, आम्ही अन्याय सहन करणार नाही, पाणी आमच्या हक्काचं… नाही कुणाच्या बापाचं, पाणी पुरवठा विभागाला अचानक तोटा कसा असे प्रश्न व सल्ले बॅनरमधून दिले आहेत.
नदीकाठी राहूनही कराडकरांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागणार, अशी परिस्थिती या निर्णयामुळे निर्माण झाली आहे. काल मुख्याधिकारी कराड यांनी 11 तारखेपासून एक वेळ पाणी येणार नाही, असे निवेदन दिले. या निवेदनामुळे सर्व कराडकरांना धक्काच दिला. या निर्णया विरोधात शहरात आज काही सुज्ञ नागरिकांनी पूर्ण कराडमध्ये या विरोधात गांधीगिरी मार्गाने चौका चौकात बॅनर लावून आपल्या भावना व्यक्त केल्या. हा अन्यायकारक निर्णय रद्द झाला पाहिजे. ज्या पाण्यासाठी कराड ओळखले जाते, राज्यात कुठेही पाण्याचा तुटवडा पडला तरी कराडमध्ये कमी पडणार नाही असे छाती ठोकून सांगितले जाते. त्याच कराडमध्ये ही लाजिरवाणी बाब होत आहे.
नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कराडचे मुख्याधिकारी यांनी कराडमध्ये 11 तारखे पासून एकवेळच पाणी येणार अशा स्वरूपाचे परिपत्रक काढले. या परिपत्रकामुळे कराडकरांची झोपच उडाली आहे. गेली दोन ते तीन वर्षांपूर्वी शहरात 24 तास पाण्याची पाईपलाईन टाकली गेली आहे. आता नागरिकांना प्रतीक्षा आहे, ती 24 तास पाणी आपल्या दारात येण्याची.
शहरात पाणी कपातीचे कारण…
कराड नगरपालिकेच्यावतीने कराड शहरात सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळेस पाणी पुरवठा केला जातो. यासाठी नगरपालिकेला सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च आहे, मात्र तूलनेत उत्पन्न कमी आहे (साडेतीन कोटी). दर महिन्याला पलिकेला एमएसीबीचे बिलावर सर्वात मोठा खर्च करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत नगरपालिकेस ही योजना चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 8 कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा सुरू ठेवत असताना यात साडेचार कोटींचा तोटा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी सध्या नगरपालिकेकडे खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.