हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही महाविकास आघाडीत जागा वाटपाचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. अशातच, “टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही सांगलीची (Sangali) जागा सोडणार नाही” अशी रोखठोक भूमिका काँग्रेस (Congress Party) आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यानी घेतली आहे. त्यामुळे आता आघाडीतील जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखीन वाढला आहे.
चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी
नुकत्याच झालेल्या आघाडीच्या बैठकीमध्ये सांगलीची जागा ठाकरेंना सोडण्याबाबत वरिष्ठांचे एकमत झाले. परंतु या निर्णयाला विश्वजित कदम यांनी विरोध दर्शवला आहे. आता या कारणामुळे सांगलीच्या राजकारणातही अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत. ठाकरे गटामध्ये सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील इच्छुक आहेत. त्यामुळेच त्यांना सांगलीतून उमेदवारी देण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता महाविकास आघाडीतही सांगलीची जागा ठाकरेंना देण्यासाठी एकमत झाले आहे. यावरूनच सांगलीमधील काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
यावरच प्रतिक्रिया देताना विश्वजित कदम यांनी म्हणले आहे की, “सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. आम्ही आमच्या जागेसाठी ठाम आहोत. सांगलीची जागा आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. सांगलीत काँग्रेसची या ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये ताकद आहे, संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत. ते वैयक्तिक काही सांगत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही जागा सोडणार नाही.”
दरम्यान, माध्यमांशी बोलताना सांगलीची जागा शिवसेना लढणार असल्यामुळे त्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला दिली जाईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली होती. यानंतरच विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेसंदर्भात आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी बोलताना, त्यांनी चंद्रहार पाटील हे आमचे मित्र असल्याचे देखील सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा मुद्दा सुटेल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.