Sunday, May 28, 2023

जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर कोविड सेंटर सुरू

सातारा | खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी कोव्हीड सेंटर सुरू करावे, अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच पडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने व तत्परतेने हा प्रश्न सुटल्याचेही सुरेंद्र गुदगे यांनी सांगितले.

या वेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, खटाव पंचायत समिती सभापती जयश्री कदम, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी इन्नुस शेख, डॉ. सुशीलकुमार तुरुकमाने, माजी सभापती संदीप मांडवे, रवींद्र सानप, सरपंच मनीषा सानप आदी उपस्थित होते.

सुरेंद्र गुदगे म्हणाले, “कोविड केअर सेंटरमध्ये 70 बेडची व्यवस्था होणार आहे, सध्या 20 बेड सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी ऑक्‍सिजनयुक्त 30 बेड सुरू केले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्‍यात व्हेंटिलेटर कक्ष सुरू करावेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल.”