सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा येथे खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत विविध कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र व धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा केला जात आहे. या निमित्ताने सर्व बँकांनी अर्थ सहाय्याच्या योजना दारोदारी पोहचवून सर्वसामान्य नागरिकांना उद्योग उभारणीसाठी व त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी जास्तीत जास्त कर्जाची प्रकरणे मंजूर करावीत, असे आवाहन पाटील यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज एक कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, “बचत गटांनी आता लोणचे, पापड या उद्योगातून बाहेर पडून बाजार पेठेत कोणता माल जास्त विकला जाईल याचा अभ्यास करुन उद्योग उभा करुन आपले ठरवलेले ध्येय प्राप्त करावे. बँकांनीही आलेली कर्जाची प्रकरणे जास्तीत जास्त मंजूर करुन कर्ज प्रकरण मंजुर करण्यात जिल्हा अग्रेसर राहिल यासाठी प्रयत्न करावा.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, सातारा जिल्हा हा देशाला दिशा देणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात बँकांचे मोठे जाळे आहे. जिल्ह्यात शेतकरी कृषी पर्यटनाकडे वळत आहे. या कृषी पर्यटन केंद्र उभाराणीसाठी आणि लहान उद्योग उभे करणाऱ्यांना बँकांनी कर्ज पुरवठा करावा. शासनाच्या अर्थ सहाय्याच्या योजना नागरिकांना समजेल अशा भाषेत समजून सांगाव्या. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर दिनकर संकपाळ, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक राजेंद्र चौधरी, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक युवराज पाटील आदीसह बचत गटांच्या महिला, विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.