सांगली | जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली वाढल्या असताना राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनेलद्वारे निवडणूक लढविण्यावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेस 11, काँग्रेस 8 आणि शिवसेनेला 2 जागा देेण्याचा फॉर्म्युला ठरविला आहे. मात्र शिवसेना चार जागांवर ठाम अडून राहिली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून निर्णय घेऊ, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याचे समजते. जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर रविवारी होण्याची शक्यता आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जागा वाटप करण्यासाठी सोमवारी रात्री साडेअकरा वाजता सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री जयंत पाटील, अनिल बाबर, विक्रम सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, अविनाश पाटील, अॅड. बाबासाहेब मुळीक, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने बॅँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे बँकेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला पुन्हा एकदा मांडला. तत्पूर्वी काँग्रेसने सुरुवातीला नऊ जागा मागितल्या होत्या तर शिवसेना चार जागांवर आग्रही होती. मात्र चर्चेअंती काँग्रेस आठ, शिवसेना दोन तर राष्ट्रवादी उर्वरित 11 जागा मिळणार आहेत.