सातारा | सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या रणनीती संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावर खलबते केली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांनी शिवसेना जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघनिहाय चाचपणी केली आहे. जिल्हा बँक ही प्रामुख्याने काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याच ताब्यात राहिली आहे. गेल्या चौदा वर्षांपासून बँकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून, आजपर्यंत शिवसेनेला बँकेवर कधी संधी मिळाली नाही. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला बँकेवर प्रतिनिधित्व मिळावे, असा आग्रह शंभूराज देसाई यांचा आहे. त्यादृष्टीने ३ सप्टेंबरच्या नंतर कोणती रणनीती आखायची या विषयावर चर्चा करण्यात आली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून, या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्याची महत्वपूर्ण बैठक साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील, धैर्यशील कदम यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतदार संघनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. कच्ची मतदार यादी, उमेदवारांची वर्गवारी याबाबत चर्चेनंतर आपापल्या मतदारसंघात व कार्यक्षेत्रात कशा पध्दतीने निवडणुकीच्या अनुषंगाने काम करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेना जिल्हा बँकेच्या आखाडयात उतरणार असून, याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सातारा सांगली संपर्कनेते नितीन बानुगडे पाटील यांनी स्पष्ट केले.
पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेची जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत अधिकृत घोषणाही लवकरच करण्यात येईल, असे प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या बैठकीस राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, प्रा. नितीन बानगुडे-पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. युवानेते धैर्यशील पाटील, शेखर गोरे, डी. एम. बावळेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.