हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने कालपासून राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेत मंदिरे खुली केली. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी मंदिरात जाऊन पूजा केली. मात्र, यासाठी मंदिर व जिल्हा प्रशासनाने ठराविक नियम घालून दिले होते. नवरात्रीच्या काळात मंदिरात पूजा-विधी करता येणार नाही, अशा सूचना प्रशासनाने दिल्या असतानाही भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी तब्बल अर्धा तास पूजा विधी केला. यानंतर त्यांच्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नवरात्रोस्तवाच्या प्रारंभी राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयानंतर तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडण्यात आले. यावेळी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मंदिरात जाऊन सहकुटुंब दर्शन घेतले. तसेच अर्धा तास पूजा केली. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ भोसले यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील मंदिरे भाजपच्या आंदोलनामुळेच खुली करण्यात आल्याचे सांगत आनंद व्यक्त करण्यासाठी आचार्य भोसले यांनी नियम डावलून गुरुवारी दुपारी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष उपस्थित होते. राजकीय पुढाऱ्यांसाठी नियम डावलून थेट गाभाऱ्यातून दर्शनाचा लाभ देण्यात आल्याने भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.