हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Manipur Violence) सुरु आहे. मैतेई आणि कुकी समाजामधील संघर्ष टोकाला गेला असून हिंसाचार, जाळपोळीच्या घटना मणिपूरात रोज सुरु आहेत. त्यातच भर म्हणजे काही नराधमांनी महिलांची नग्न दिंड काढल्याची घटनाही समोर आली. या सर्व घडामोडींवरून देशभरातील विरोधी पक्ष केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असतं आता भाजप आमदार पौलेनलाल हाओकीप यांनी एक मोठं विधान केलं आहे. हिंसाचार रोखायचा असेल तर मणिपूरचे तीन भागात विभाजन करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कुकी समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे पौलेनलाल हाओकीप म्हणाले, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्याचे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले पाहिजे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा कुकी समाजाच्या नेत्यांनी कुकी जमातीच्या लोकांसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली आहे. त्यामुळे पौलेनलाल हाओकीप यांच्या मागणीला एक प्रकारे कुकी नेत्यांच्या वेगळ्या राज्याच्या मागणीलाही पाठिंबा आहे. त्यामुळे मणिपूर सरकार आणि केंद्र सरकार याबाबतचा विचार करणार का हे आता पाहावे लागेल.
दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग आणि Meitei संघटनांचा समूह COCOMI यांनी मात्र मणिपूरच्या विभाजनाच्या कोणत्याही मागणीला विरोध केला आहे. केंद्र सरकारही मणिपूरच्या विभाजनाचे कोणत्याहि प्रकारे समर्थन करण्याच्या तयारीत नाही. हाओकिप यांचं म्हणणं मानलं तर मणिपूरमध्ये कुकी, मेईतेई आणि नागा जमातींसाठी स्वतंत्र राज्य तयार झाले तरी ज्या भागांमध्ये मिश्रित लोक आहेत तिथे संघर्ष निर्माण होऊ शकतो. मणिपूरमध्ये ३ मे रोजी सुरू झालेला हिंसाचार अजूनही सुरूच आहे. यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. आत्तापर्यंत या हींसाचारत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोकांना या हिंसाचाराच्या झळा सोसाव्या लागत आहेत.