हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात दिवाळी पर्व सुरू आहे. उद्या याचं दिवाळी पर्वातील महत्त्वाचा सण म्हणजेच दिवाळी पाडवा आहे. हिंदू धर्मामध्ये दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कारण, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो तो म्हणजे दिवाळी पाडवा. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा साजरी केला जातो. आज आपण याचं दिवाळी पाडव्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
दिवाळी पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण होय. या सणादिवशी बलिप्रतिपदा पूजेला विशेष महत्व देण्यात येते. तसेच, बळीराजाची रांगोळी काढून त्याला पुजले जाते. यादिवशी त्याची पूजा करून “ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असे म्हणले जाते. या दिवशी व्यापारी आपल्या आर्थिक नववर्षाला सुरुवात करतात. तसेच, शेतकरी बळी राजाची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा करतात.
पौराणिक कथा
पौराणिक कथा आपल्याला असे सांगते की, बलिप्रतिपदेतील बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. पाडव्या दिवशी या बळीराजाला तीन पावले जमीन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले होते. बळीराजा हा शेतकऱ्यांचे हित जपणारा होता. तो कधी ही आपल्या राज्यातील शेतकऱ्याला दुखी होऊ देत नव्हता. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी ग्रामीण भागात बळीराजाची पूजा करण्यात येते. तसेच, यादिवशी शेतकरी आपली अनेक शेतातील कामे मार्गी लावतात.
दरम्यान, पाडव्याच्या दिवसापासून हिंदू परंपरेनुसार नविन वर्षाला सुरुवात होते. पाडवा हा सण पती पत्नीमधील प्रेम फुलवणारा सण देखील मानला जातो. या दिवाळी पती आपल्या पत्नीला खास अशी भेट वस्तू देतो. तसेच, पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते. पाडव्याच्या सणापासून अनेक नव्या कामांना सुरुवात करण्यात येते. यासाठी पाडवा हा सण अत्यंत महत्त्वाचा ठरतो.