औरंगाबाद – औरंगाबाद महानगरपालिकेतील चतुर्थश्रेणी वर्गातील 2656 आणि 692 अस्थायी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सुमारे 1 कोटी 5 लाख रुपये देण्याची तरतूद मनपा प्रशासन असते कुमार पांडेय यांनी गुरुवारी केली आहे. यामध्ये 2656 कर्मचाऱ्यांना साडेतीन हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि अस्थायी व इतर कर्मचाऱ्यांना 2 हजार दिवाळी भेट म्हणून देण्याचे आदेश काढले आहेत. पुढच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती मुख्य लेखा अधिकारी संतोष वाबळे यांनी दिली आहे.
महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि अस्थायी, अंगणवाडी शिक्षिका, तासिका वरील शिक्षिका, आशा वर्कर्सना इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कोणतेही लाभ मिळत नाही.
यामध्ये 2593 चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून शिक्षण विभागातील 63 कर्मचारी मिळून 2656 कर्मचारी आणि 602 अस्थायी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान व दिवाळी भेट देण्यासाठी लेखा विभागाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना साडेतीन हजार रुपये याप्रमाणे 92 लाख 96 हजार रुपये आणि अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार रुपये याप्रमाणे 12 लाख 4 हजार रुपये असे एकूण 1 कोटी 5 लाख रुपये लागणार असल्याचा प्रस्ताव सादर केला. मनपा प्रशासकांनी कालिया प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.