Wednesday, February 8, 2023

प्रेयसीने केला विश्वासघात; प्रियकराने काढला काटा ! गुन्हे शाखेकडून आरोपीला बेड्या

- Advertisement -

औरंगाबाद – ज्या प्रेयसीसाठी बायको-मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिने दहा वर्ष सोबत राहिल्यानंतर म्हातारा झाल्याचे सांगून दुसरा प्रियकर गाठला. यामुळे संतापलेल्या माजी प्रियकराने तिला एकलहरा शिवारात नेऊन मारून टाकले व प्रेत विहिरीत टाकून दिल्याची घटना 23 सप्टेंबर रोजी घडली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावून या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक अमोल मस्के यांच्या पथकाला वाळूज एमआयडीसी परिसरात 5 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पाठवले होते. त्यावेळी त्या ठिकाणी मारिया सुरेश अल्हाट या महिलेची आत्महत्या नसून खून झाल्याचे समजले. त्याच दिवशी त्या प्रकरणात गुन्हे शाखेने तपास सुरू केला. यात सुनील खरात याचे नाव समोर आले‌ चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार मारियाच्या पतीचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले. तिला पतीपासून एक मुलगी होती. सुनील व ती दहा वर्षापासून पती-पत्नी सारखी राहत होते. तिच्यासाठी सुनील ने पत्नी मुलांना सोडून दिले. चार एकर जमीन विकली. मारीयाला सुनील पासून दोन मुले झाली. मात्र, ती काही दिवसांपासून त्याच्यापासून दूर राहू लागली. आपण आता बहीण भावासारखी राहू तू म्हातारा झाला आहेस असा तिने टोमणा मारला. यामुळे दुखावलेल्या सुनील ने तिला संपवण्याचे ठरवले.

- Advertisement -

दरम्यान त्याला मारियाचे सूत्र एका ठेकेदारासोबत जुळण्याचे समजले. यामुळे संतापलेल्या सुनीलने तिला एकलहरा शिवारात नेले. त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर मक्याच्या शेतातील चिखलात तोंड दाबून मारून टाकले. त्यानंतर प्रेत विहिरीत टाकून दिले. हा गुन्हा पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त अर्पणा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे.