औरंगाबाद – पोलिस काम करतांना कायद्यानुसारच काम करतात, पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करून त्यांच्यावर दबाव आणू नका असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी केले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी दुपारी शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासमोर जोरदार राडा झाला होता. या राड्याची दखल घेत पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी बुधवारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याला भेट देवून पीडित महिलेला पोलिस ठाण्यात बोलावून घेत तिच्याशी संवाद साधला होता.
भाजपचे पदाधिकारी अशोक दामले यांनी घराजवळ राहणाNया तक्रारदार महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी घडली होती. या घटनेनंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून अशोक दामले यांच्याविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाख्ला करण्यात आला होता. त्यानंतर दामले यांच्या समर्थकांनी पीडित महिलेविषयी अश्लिल मजकुर असलेला अर्ज पोलिस ठाण्यात देत तो अर्ज सोशल मिडियावर व्हायरल केला होता. या प्रकरणात शिवसेना महिला आघाडीसह पदाधिकाऱ्यानी मंगळवारी पोलीस ठाण्यात धाव घेत पिडित महिलेचे छायाचित्र सोशल मिडियात व्हायरल केल्याच्या प्रकरणात दामले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावर पोलीस कारवाई करीत असताना दामले यांच्या समर्थनात भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी दाखल झाले. त्यानंतर पोलीस ठाण्यासमोरच शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाNयांत जोरदार वादावादी झाली होती.
या प्रकारानंतर पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी बुधवारी दुपारी पुंडलीकनगर पोलीस ठाण्याला भेट देत आढावा घेतला. तसेच पिडित महिलेशीही पोलीस आयुक्तांनी संवाद साधला. पीडित महिलेशी संवाद साधल्यानंतर पोलिस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले की, पोलीस कायद्याप्रमाणे तपास करून निर्णय घेतील. तपासात जे काही निष्पण्ण होईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. पोलीस ठाण्याच्या समोर वादावादी करणे योग्य नाही, असा प्रकार कोणीही करू नये, असे आवाहनही डॉ. गुप्ता यांनी केले. तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीतील हकीकतीनुसार कलम लावण्यात आले आहेत. जे कलम लावले त्या एफआयआरची प्रत तक्रारदार महिलेला दिलेली आहे. त्यात सर्व काही आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. बदल केला असल्याची चर्चा चुकीची आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर तपासातील निष्कर्षानुसार कलम रद्द करणे, वाढविणे किंवा त्यात बदल करता येतो. ही एक प्रक्रिया आहे. तपासानंतरच सर्व काही स्पष्ट होईल, असेही डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.